Tuesday, 15 March 2016

पंजाबी चित्रपटाने मोडला बाजीराव मस्तानीचा बॉक्स ऑफीस रेकॉर्ड

मुंबई, दि. १५ - गेल्या वर्षीच्या बहुचर्चित 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाने सर्वांची वाहवा मिळवत बहुसंख्य पुरस्कार तर पटकावलेच पण बॉक्स ऑफीसवरही तूफान कामगिरी दाखवत बराच गल्ला कमवला. पण या चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवरील रेकॉर्ड आता मोडला गेला आहे. 'लव्ह पंजाब' या पंजाबी चित्रपटाने बाजीराव मस्तानी व एअरलिफ्टपेक्षा जास्त कमाई करत नवा विक्रम रचला.
या चित्रपटात पंजाबी अभिनेता व गायर अमरिंदर गिल व सरगुन मेहता यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. हा एक कौटुंबिक चित्रपट असून राजीव धिंग्राने त्याचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या मुलाला एकत्र कुटुंबाचे महत्व पटवून देण्यासाठी एक जोडपं पंजाबला येतं आणि तिथे काय घडतं, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले .
  • हा चित्रपट परदेशात खूप यशस्वी ठरला असून अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. या चित्रपटाची ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँडमधील कमाई ही अक्षय कुमारचा एअरलिफ्ट व रणवीर सिंगच्या बाजीराव-मस्तानीपेक्षाही अधिक झाली आहे. 
    ' बॉक्स ऑफीस ट्रेंड तुमच्या कल्पनेपलीकडील ठरू शकते आणि हीच त्याची खासियत आहे.  लव्ह पंजाब आणि अरदास या चित्रपटांनी हे म्हणणे खरे ठरवले आहे.' असे ट्रेड अॅनॅलिस्ट तरूण आदर्शने म्हटले आहे. ' लव्ह पंजाब' चित्रपटाने ऑस्ट्रेलिया व न्युझीलँडमधील फक्त एअरलिफ्ट चित्रपटाचा नव्हे तर बाजीराव मस्तानीचाही ओपनिंग वीक मधील रेकॉर्ड मोडला आहे. लव्ह पंजाब, अरदास आणि एअरलिफ्ट हे २०१६ सालातील ऑस्ट्रेलियातील टॉप ३ चित्रपट असून पहिले दोन चित्रपट पंजाबी आहेत, असे त्याने म्हटले.
    लव्ह पंजाबने ऑस्ट्रेलियामध्ये ४ लाख ६ हजार ६०१ डॉलर्स ( सुमारे २.७ कोटी रू) तर न्युझीलँडमध्ये ५१.९१ लाख रुपयांचा गल्ला जमवला.
    रणवीर सिंगच्या बाजीराव मस्तानीने ऑस्ट्रेलियातील बॉक्स ऑफीसमध्ये १.४४ कोटी रुपये तर न्युझीलँडमध्ये सुमारे २६.५० लाख रुपये कमवले. तर अक्षय कुमारच्या एअरलिफ्टने ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे ९३ लाख रुपये आणि न्युझीलँडमध्ये अंदाजे ३६ लाख रुपये कमावले होते.

Tuesday, 8 March 2016

कांदिवलीत सिग्नल बिघाड, पश्चिम रेल्वे विस्कळीत

आणखी संबंधित बातम्या
  •  
    मुंबई, दि. ८ - कांदिवली येथे सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर दोन्ही दिशांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर गाडया वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. युद्धपातळीवर सिग्नलमधील बिघाड दूर करुन वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सिग्नलमधील बिघाडामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांचा खोळंबा होत आहे. संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्वपदावर आली नाही तर, कामावरुन घरी परतणा-या प्रवाशांचे हाल होऊ शकतात. 

Tuesday, 9 February 2016

मी कोणतीही चूक केली नाही, पवार साहेबांचे आशिर्वाद पाठिशी - छगन भुजबळ

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे अखेर आज दुपारी अमेरिकेतून मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी विमानतळावर मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले
' आपण कोणतीही चूक केलेली नसून कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत शरद पवारांचा आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचे ' भुजबळ यांनी नमूद केले. 
गेल्या आठवड्यात भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापे मारण्यात आले होते. एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांनी छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारले. 
छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती. 
तर याचप्रकरणी भुजबळ यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांना इडीने गेल्या आठवड्यात अटक करून त्यांचा पासपोर्टही जप्त केला.