Tuesday 15 March 2016

भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित - शरद पवार

मुंबई, दि. १५ - छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मनी लाँडरिंगच्या आरोपावरून सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री १० वाजता भुजबळ यांना अटक केली. ते उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती देऊ न शकल्याने आणि चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री सांगितले. 
या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी भुजबळ यांची पाठराखण करत पक्ष संपूर्णपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे नमूद केले. भुजबळांसाठी पक्ष कायदेशीर लढाईदेखील लढेल असेही त्यांनी सांगितले. 
तसेच महाराष्ट्र सदनासंबंधीचे निर्णय फक्त भुजबळांनी घेतले नाहीत, तर  ते निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाचे होते असं सांगत पवारांनी भुजबळांची पाठराखण केली.












दरम्यान भुजबळांच्या अटकेचे राज्यभरात पडसाद उमटले असून भुजबळ समर्थकांनी विविध ठिकाणी रास्तारोको करत निदर्शने केली. तसेच विधानभवनाच्या पाय-यांवरही आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या.
 
- छगन भुजबळ यांना केलेल्या अटकेचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित काँग्रेस, पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर हाताला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला.
- आजच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विधानसभेतही या आंदोलनाचे पडसाद उमटले. - नियम ९७ अन्वये जयंत पाटील यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव आणून छगन भुजबळ यांच्या अटकेविषयी सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेची मागणी केली होती.
- विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला. या निषेधार्थ विधानसभेत विरोधकांनी तीव्र स्वरांत आवाज उठवला.
- विधानपरिषदेमध्ये २८९ अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव आणून भुजबळ यांच्या अटकेच्या बाबत चर्चा करण्याची मागणी केली.
- मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास आधी घेऊ असे सांगताच गोंधळ उडाला. त्यामुळे परिषद अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली.

No comments:

Post a Comment