डेहराडून, दि. १५ - उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान भाजपा आमदाराने एका घोड्यालाबेदम मारहाण केल्यामुळे त्याचा पाय मोडल्याची दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना मसुरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी मसुरी येथील भाजप आमदार गणेश जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी फंडाचा गैरवापर केल्याचा आरोप करत गणेश जोशी यांनी समर्थकांसह आंदोलन केले. त्यांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जोशी व समर्थकांनी हल्ला चढवला, त्याचवेळी जोशींनी पोलिसांच्या घोड्यावरही हल्ला केला. त्यांनी सुरवातीला घोड्याच्या तोंडावर दांडुका मारला, त्यांनतर त्याच्या पायावर प्रहार केल्याने घोडा खाली कोसळला. या दुर्दैवी घटनेत तो घोडा जबर जखमी झाला असून त्याचा एक पाय मोडला आहे, त्याला इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, अशी माहिती डेहराडूनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सदानंद दाते यांनी दिली.
दरम्यान आपल्या या कृत्याचा जोशी यांना जराही पश्चाताप झालेला दिसत नसून उलट त्यांनी या कृत्याचे समर्थनच केले. ' पोलीस आंदोलकांना निर्दयीपणे मारहाण करत होते, त्यावेळी आम्ही बचावार्थ त्यांच्या काठ्या खेचून घेतल्या. मात्र त्यानंतर पोलिसांनी घोड्यांचा वापर करून आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता, त्या झटापटीत घोड्याला दुखापत झाली. आम्ही काही त्याला मुद्दाम मारहाण केली नाही, आमची चूक नव्हती. त्या घोड्याला संपूर्ण दिवस पाणी आणि जेवण न दिल्यानेच तो खाली कोसळला' असे स्पष्टीकरण जोशी यांनी दिले. याप्रकरणी जोशी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी या दुर्दैवी घटनेबाबत दु:ख व्यक्त करत घोडा वा कोणत्याही मुक्या प्राण्याला अशा घटनेत ओढणे चुकीचे असल्याचे म्हटले. तसेच भाजपच्या शब्दकोशात सहिष्णु हा शब्दच नसल्याची टीकाही त्यांनी केली.
No comments:
Post a Comment